दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहीद दिवस साजरा झाला. कुणी प्रतिमा पूजन केलं तर कुणी प्रोफाईल्स अपडेट केले. याचदिवशी 86 वर्षांपूर्वी ही माती तिच्या तीन पुत्रांच्या हौतात्म्याने पेटून उठली होती. त्या आगीची झळ तिच्यावर राज्य गाजवू पाहणाऱ्या परकीयांना पोहचत होतीच पण ती स्वतः वेदना सोसत होती, वेदनामुक्त होण्यासाठी.. आणि या मुक्तीच्या महायज्ञात स्वतःच्या प्राणाची आहुती देताना त्या तीन युवकांच्या मनाची स्थिती काय असेल? काय साध्य होणार होतं त्या शरीराचा त्याग करून? भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आदींनी याचा विचार केलाच असेल ना? ते तिघेच कशाला, स्वातंत्र्यसंग्रामात देशप्रेमाने भारून गेलेल्या प्रत्येकाचे प्राणार्पण हे त्यांच्या ध्येयाच्या मार्गावरील एक पाऊल होते. ही माणसे झेंडे आणि नकाशांच्या पलीकडे जाऊन मानवी जीवनाच्या उत्कर्षाकडे अग्रेसर झालेली असतात. मानवजातीचे उत्थान घडवायचे असेल तर स्वातंत्र्य अनिवार्य आहे. आणि देशातील लोकांचे वैचारिक, सांस्कृतिक स्वातंत्र्य परकीयांच्या महत्वाकांक्षेखाली दबत चालले असताना फक्त पाहत राहणे या 'वेड्या' माणसांकडून शक्य होत नाही. मग पराधीनतेच्या साम्राज्याला सुरुंग लावणारी स्फोटके जन्म घेतात.. कधी शब्दरुपी तर कधी शस्त्ररुपी.. शब्द आणि शस्त्र यांच्या मीलनातून जे जन्म घेत ते क्रांतिकार्य. फक्त शत्रूला नामोहरम करणे हाच क्रांतिकार्याचा उद्देश नसून त्याहीपलीकडे जाऊन प्रत्येकाला स्वतःच्या सामर्थ्याची ओळख करून देणे, स्वतःच्या गुलामीची जाणीव करून देणे हा असतो, जेणेकरून पारतंत्र्याच्या ओझ्याखाली दबुन गेलेला समाजमनाचा आवाज गुलामीविरुद्धचा आक्रोश बनून उसळणार असतो. मग परिवर्तनाचे नवे पर्व सुरु होते. इथे ना भय असते ना द्वेष ना अज्ञान.. अशा आदर्श राष्ट्राची उभारणी हेच भगतसिंग आदी क्रांतिकारकांचे स्वप्न होते. स्वतंत्र भारताचे सार्वभौमत्व आम्हाला अधिकाराने मिळाले सुद्धा पण या अधिकारासोबत येणारे आद्यकर्तव्य म्हणजे त्या स्वप्नाचे पाईक होणे.
Ashish Prakash Jadhavआमच्या पावलाखालच्या स्वतंत्र मातीत कित्येकांचे रक्त मिसळले आहे, या हवेत कित्येकांचे अखेरचे श्वास आणि इन्कलाब जिंदाबाद सारखे शब्द गुंजत असतात.. आम्हाला याची जाणीव आहे? आम्हाला जाणीव होते प्रांतीय राजकारण करताना, जातीय आणि धार्मिक भांडणे करताना. अशा वेळी आमच्या जाणीवा संवेदनशीलतेचा सगळ्या मर्यादा पार करतात. हा नतद्रष्टपणाच नव्हे का? खरे तर देशप्रेमाने आंधळे झालेले लाखो आहेत. ते देशप्रेम आभासीच म्हणावे लागेल कारण खऱ्या प्रेमाइतके डोळस दुसरे काहीच नसते. हीच आंधळ्यांची फौज राष्ट्राची मूळची संकल्पना डावलून समाजाला 'प्रकाशमयी भविष्याची' स्वप्ने दाखवते. ज्यांना राष्ट्र समजलेच नाही ते राष्ट्र घडवणार कसे? देश हा चार-पाच लोकांच्या विचारसरणीवर चालत नाही. राष्ट्राची स्वतःची एक वैचारिकता असते आणि सद्सद्विवेक हाच तिचा पाया असतो. ही विवेकबुद्धी जपणे, आणि अधिक मजबूत करणे हेच या महान स्वप्नाच्या मार्गातील मोठे आव्हान आहे.
छान.....
ReplyDeleteखरंच प्रत्येकानं देशाच्या बाबतीत विचार केला पाहिजे.
बलिदान दिलेल्या प्रत्येक क्रांतिकारी देशभक्तांची हीच इच्छा होती.
������
nice
ReplyDeleteखूप छान अशिष
ReplyDeleteआपण फक्त एक दिवस फोटो ठेवत असतो पण असा अापण कधीच विचार करत नाही
'आमच्या पावलाखालच्या स्वतंत्र मातीत कित्येकांचे रक्त मिसळले आहे, या हवेत कित्येकांचे अखेरचे श्वास आणि इन्कलाब जिंदाबाद सारखे शब्द गुंजत असतात.. आम्हाला याची जाणीव आहे?'...well said. Everyone should feel responsible for their duties toward our country.
ReplyDeleteBhava ,mala proud vatto tu maza friend ahes, khup chan lihlas,he pratyekane atmasad kelach pahije
ReplyDeleteVery Nice...
ReplyDeleteKhupppp khup chan lihtos ashish
ReplyDeleteKupach Chan Ashish...keep it up
ReplyDeleteThank you...
ReplyDelete